मोहीम १६ जूनपासून सुरू, मुख्याध्यापक,प्राचार्य यांना निर्देश.
मुंबई/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १६ जूनपासून राज्यभर राबवली जाणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना एसटी प्रवास पास मिळवण्यासाठी एसटी आगारात जावे लागणार नाही.
या योजनेअंतर्गत, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे बस पास थेट त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित शाळा/महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी, आपल्या संस्थेतील पाससाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी एसटी आगार व्यवस्थापकांना आधीच उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे लाखो विद्यार्थ्यांना पाससाठी होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळेल. शिक्षण अधिक सुलभ आणि पोहोचण्याजोगं होईल, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.”
राज्यातील सर्व एसटी आगारांना यासंदर्भात आवश्यक सूचना पाठवण्यात आल्या असून, शाळा आणि महाविद्यालयांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्काळ तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.