मुंबई/ प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- एसटी महामंडळाच्या अधिकृत हॉटेल थांब्यांवर प्रवाशांना वारंवार भेडसावणाऱ्या अन्नाची खराब गुणवत्ता, अस्वच्छ शौचालये, वाजवी दराचा अभाव यासारख्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली असून, एसटी महामंडळाने यासंदर्भात नवीन आचारसंहिता जारी केली आहे.
पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानकपणे एका अधिकृत हॉटेल थांब्याची पाहणी करताना प्रत्यक्ष अनुभवलेल्या असुविधांवर मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तात्काळ एसटी महामंडळाने राज्यभर लागू होणारी सुधारित धोरणे आणि कडक नियम प्रसिद्ध केले.
नव्या आचारसंहितेतील महत्त्वाचे मुद्दे:
1. पारदर्शक निवड प्रक्रिया: हॉटेल थांब्यांना आता केवळ निविदा प्रक्रियेद्वारे ३ वर्षासाठी मंजुरी दिली जाणार. मात्र, १ वर्षानंतर त्या हॉटेलची सेवा तपासूनच पुढील मुदतवाढ देण्यात येईल.
2. गुणवत्तेचा निकष अनिवार्य: स्वच्छता, अन्नपदार्थांची गुणवत्ता, व बस पार्किंगची सुविधा यांचा सखोल विचार करूनच निवड केली जाणार.
3. अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित: आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणे बंधनकारक. तक्रार आल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार.
4. एफआयआरची तरतूद: फसवणूक किंवा नियमभंग करणाऱ्या हॉटेल थांब्यावर एफआयआर दाखल केला जाईल. मार्ग तपासणी पथकांकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार.
5. महामंडळाचा महसूल व प्रवासी सुविधा दुहेरी उद्देश: या धोरणामुळे प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळेल आणि महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
प्रवाशांना आवाहन: प्रवाशांनी अधिकृत थांब्यांवरील असुविधा किंवा गैरप्रकारांची तक्रार संबंधित एसटी कार्यालयात त्वरित नोंदवावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.