जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा, उत्सवाचा आणि फराळाचा सोहळा नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील गूढ, पवित्र आणि संवेदनशील जाणीव आहे. याच दिवाळीला जेव्हा पहाटेच्या नीरव शांततेत संगीताचे सुर आणि प्रकाशाची लकेर सजते, तेव्हा ती एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्वणी ठरते. पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या सुबोनियो परिवारातर्फे यंदा आयोजित करण्यात आलेल्या “सप्तसुरांची संगीत व प्रकाशमय दिवाळी पहाट” या कार्यक्रमाने जळगावकर रसिकांना पहाटेच्या सुरेल वातावरणात संगीताचा अनोखा अनुभव दिला. हा कार्यक्रम खान्देशातील सुप्रसिद्ध निवेदक व संगीत संयोजक तुषार वाघुळदे यांच्या संकल्पनेतून “ऑर्केस्ट्रा 7 स्ट्रिंग्स” प्रेझेंट्सच्या माध्यमातून साकारला गेला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे, उद्योगपती राजेश चौधरी, मनसे नेते जमील देशपांडे, सुबोध चौधरी व जितेंद्र खडके यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळच्या आल्हाददायक वातावरणात कालिंका माता चौक परिसरात नागरिक, रसिक व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तीच्या सुवासाने भारलेली आणि आधुनिक संगीताच्या झंकाराने उजळलेली ही सकाळ जळगावकरांसाठी संस्मरणीय ठरली. या मैफिलीत खान्देशातील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका ऐश्वर्या परदेशी, गायक मयूरकुमार, गायिका भानुप्रिया ठाकूर, तसेच नवगायिका दीक्षा सपकाळे यांनी भक्तिरस, भावगीत, शास्त्रीय आणि आधुनिक गाण्यांच्या माधुर्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले “ज्युनियर नाना पाटेकर” राजू पाटील, ज्यांनी वासुदेव, साईबाबा आणि नाना पाटेकर यांच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली.

या “स्वरसोहळ्या”त भूपाळी, भक्तिगीते, भावगीते, गझल, लावणी अशा विविध संगीतप्रकारांमधील सुमधुर सादरीकरण झाले. संगीत सादरीकरणाला साथ-संगत राजू जाधव, शैलेश पगारे, प्रवीण महाजन, जयंत महाजन, आणि दीक्षा सपकाळे यांनी दिली. “आली माझ्या घरी ही दिवाळी”, “सूर निरागस हो”, “माझे माहेर पंढरी”, “घेई छंद मकरंद”, “मन मंदिरा”, “विठ्ठल नामाचा टाहो”, “आज जाने की ज़िद ना करो”, “रेशमाच्या रेघांनी”, “मेंदीच्या पानांवर” अशी अनेक अवीट गाणी सादर होऊन वातावरण भारावले.

या कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन सुप्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे यांनी तर आभार प्रदर्शन सुमोलकुमार चौधरी यांनी केले. सुबोनियो परिवाराचे आयोजक म्हणून सुबोधकुमार सुधाकर चौधरी, सुनिलकुमार सुधाकर चौधरी, सुयोगकुमार सुधाकर चौधरी, सौ. हिरा सुबोधकुमार चौधरी, सौ. सारिका सुनिलकुमार चौधरी, सौ. अपर्णा सुयोगकुमार चौधरी, सुमोल सुबोधकुमार चौधरी व सौ. सृष्टी सुमोल चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे हा सांस्कृतिक सोहळा यशस्वीपणे पार पडला. “दिवाळी पहाट” ही सुश्राव्य, अध्यात्मिक आणि प्रकाशमय अशी संगीताची सकाळ जळगावकरांच्या मनात कायमस्वरूपी दरवळणारा स्वर बनून राहिली आहे.

