अपघातांची मालिका वाढली, NHAI वर नागरिकांचा संताप!
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- तरसोद ते पाळधी या बायपास महामार्गाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली असून हा मार्ग वाहनधारकांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. तरसोद ते पाळधी पर्यंत 8 ते 10 ठिकाणी रोडच्या आधोमध मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांची मालिका वाढत आहे. विशेषतः असोदा उड्डाणपूल उतरल्यानंतर लगेचच मोठमोठ्या खड्ड्यांचा विळखा सुरू होत असल्याने वेगात असलेल्या वाहनचालकांचा अंदाज चुकत आहे. परिणामी, या परिसरात अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.असोदा उड्डाणपुलावरून उतरताना वाहनांचा वेग अधिक असतो. मात्र, पूल संपताच समोर एक ते एक फूट खोल खड्डे आ वासून उभे आहेत. अचानक समोर आलेल्या या खड्ड्यांमुळे चालकांना जोरात ब्रेक दाबावे लागतात. अशा वेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या धडकण्याचा किंवा खडीवरून वाहन घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दुचाकीस्वार येथे घसरून गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
महामार्गाची दुरवस्था केवळ मुख्य रस्त्यापुरती मर्यादित नसून, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईडपट्ट्याही पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. समोरून येणाऱ्या अवजड वाहनांना जागा देताना वाहन बाजूला घेतल्यास साईडपट्टीतील खड्ड्यांमध्ये वाहन अडकण्याची किंवा पलटी होण्याची शक्यता वाढली आहे. काही ठिकाणी अवजड वाहनांची चाके निखळण्याच्या घटनाही घडत असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, रस्त्यावरील डांबर उखडून खडी पसरली असून लाखो रुपयांचा टोल वसूल करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी,” अशी मागणी जोर धरत आहे.

