जळगाव | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- सोशल मीडियावरील किरकोळ शिवीगाळ प्रकरणातून उद्भवलेल्या वादात १९ वर्षीय तरुणाचा खून घडवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पाच संशयित आरोपींना न्यायालयानं ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (४ डिसेंबर) आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी पुढील तपासासाठी त्यांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
जळगाव येथील समतानगरातील तुषार चंद्रकांत तायडे (वय १९) यानं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक ‘रिल’ पोस्ट केली होती. त्यातील आक्षेपार्ह शिवीगाळीचा राग मनात धरून संशयितांनी कट रचल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.मंगळवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तुषार हा यावल–शेळगाव रस्त्यावरील बोरावल गावाजवळील पाटचारीजवळ दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्याला अडवले. राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे यांच्यासह इतर साथीदारांनी तुषारवर लाठ्या–काठ्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयत तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अविनाश सोनवणे (रा. सुजदे), निलेश कोळी (रा. बोरनार), कल्पेश इंगळे (रा. आसोदा), विजय सोनवणे (रा. सुजदे) यांच्यासह पाच संशयितांना अटक केली.गुरुवारी न्यायालयीन सुनावणीदरम्यान गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू जप्ती, हल्ल्यामागील हेतू आणि इतर पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयानं सर्व आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

