Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeक्राईमथर्टी फर्स्टला जिल्हा पोलिसांची ऐतिहासिक ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम ; ५१२ मद्यपी...

थर्टी फर्स्टला जिल्हा पोलिसांची ऐतिहासिक ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम ; ५१२ मद्यपी चालकांवर कारवाई.

कारवाई दरम्यान तब्बल ५१ लाख २० हजारांचा दंड वसूल.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नववर्षाचे स्वागत सुरक्षित वातावरणात व्हावे, रस्ते अपघातांना आळा बसावा व जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ३० व ३१ डिसेंबर २०२५ रोजी ४८ तासांची विशेष ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम राबविण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवर कडक नाकाबंदी करून ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’द्वारे तपासणी करण्यात आली. या ऐतिहासिक मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तब्बल ५१२ वाहनचालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली असून एकूण ५१,२०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा पोलिसांच्या इतिहासातील एकाच वेळी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

दिनांक निहाय कारवाई :
३०/१२/२०२५ रोजी १७१ तर ३१/१२/२०२५ रोजी ३४१ अशा एकूण ५१२ ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ केसेस नोंदविण्यात आल्या. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत इतर १,१०९ केसेस दाखल करून एकूण १,५११ कारवायांमधून ५१,२०,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

उल्लेखनीय कारवाई.
या मोहिमेत वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांनी विशेष सतर्कतेने कर्तव्य बजावले. सर्वाधिक ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ कारवाया जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ वाहतूक शाखा, चोपडा शहर पोलीस ठाणे व चाळीसगाव शहर वाहतूक शाखेने केल्या.

मोहिमेचा परिणाम :
पोलीस दलाच्या तत्परतेमुळे व ‘झिरो टॉलरन्स’ धोरणामुळे नववर्षाच्या रात्री जिल्ह्यात गंभीर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यात यश मिळाले आहे.

कायदेशीर इशारा :
मोटार वाहन कायदा तसेच नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून न्यायालयाकडून किमान १०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जिल्ह्यात यापुढेही अशीच कडक मोहीम सातत्याने राबविली जाणार असून नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या