पोलिसांकडून टोळी जेरबंद; १६४८ बनावट पास विक्रीचा पर्दाफाश
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात ऑनलाईन दर्शन पास काढून त्याचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या टोळीने तब्बल १६४८ बनावट दर्शन पास तयार करून त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे.
मंदिर प्रशासनातर्फे दोन प्रकारच्या दर्शन व्यवस्था आहेत.. एक मोफत दर्शन रांग आणि दुसरी देणगी रांगेतून दर्शन व्यवस्था. देणगी दर्शनासाठी ऑनलाइन पद्धतीने दर व्यक्तीमागे ₹२२० शुल्क आकारले जाते. हे पास मंदिर परिसरातील अधिकृत काऊंटर किंवा अधिकृत वेबसाइटवरून मिळवता येतात.मात्र गेल्या काही काळात मंदिर परिसरात दर्शन पासचे गैरव्यवहार वाढले होते. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब काळे, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, तसेच मंदिर समितीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. सचिन भन्साळी यांनी यावर लक्ष केंद्रित केले.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ जणांना ताब्यात घेतले. या आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर बनावट पास, ओळखपत्रे, मोबाईल व मेल इतिहास मिळून आला आहे. ते दर दर्शन पास ₹२०० ते ₹१००० या दराने विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक केलेल्या आरोपींत दिलीप नाना इलेले (रा. पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), सुदाम राजू बनाये (रा. पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), समाधान हुंबर (रा. रोकडवाडी, ता. त्र्यंबकेश्वर), शिवराज दिनकर आहेर (रा. निरंजनी आखाडा जवळ, त्र्यंबकेश्वर), मनोहर मोहन शिवरे (रा. गीतानगर, त्र्यंबकेश्वर) असून, या आरोपींनी बनावट ओळखपत्रे व मोबाईल क्रमांकाच्या आधारे दर्शन पास बुक करून ते भाविकांना जास्तीच्या किंमतीत विकले. त्यांचे मोबाईल व मेल तपासणीअंती त्यांच्याकडून १६४८ बनावट पासांची नोंद मिळाली आहे.