मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांशी सल्लामसलत करूनच पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत त्रिभाषा सूत्रासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी भाषिक विद्यार्थ्यांना ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ प्रणालीत नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यावर भर देण्यात आला. यासाठी इतर राज्यांतील धोरणांचा आढावा घेऊन एक सर्वसमावेशक सादरीकरण तयार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, त्रिभाषा सूत्रासंदर्भात भाषा तज्ज्ञ, साहित्यिक, राजकीय नेते व इतर संबंधित घटकांशी सल्लामसलत करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. या प्रक्रियेनंतरच धोरणात्मक दिशा ठरवली जाईल.
याअनुषंगाने शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे आता राज्यभर संवाद आणि सल्लामसलतीची प्रक्रिया सुरू करणार आहेत.