जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जागतिक फिजिओथेरपी दिवसाच्या निमित्ताने रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित ‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्रात विशेष मुलांसाठी फिजिओथेरपी ट्रीटमेंटचे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष मोहिमेत तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टांनी विविध थेरपी तंत्रांचा अवलंब करत मुलांच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास करण्यावर भर दिला.
कार्यक्रमात फिजिओथेरपिस्टांनी मुलांच्या वैयक्तिक गरजेनुसार व्यायाम, शारीरिक थेरपी व घरगुती व्यायामांची माहिती दिली. त्यामुळे विशेष गरज असलेल्या मुलांच्या दैनंदिन हालचाली सुलभ व्हाव्यात तसेच त्यांचा आत्मविश्वास व सामाजिक सहभाग वाढवावा, यासाठी प्रयत्न केले गेले. यावेळी पालकांना देखील योग्य मार्गदर्शन केले गेले, जेणेकरून ते घरच्या वातावरणात मुलांसोबत थेरपी व्यायाम करु शकतील.
या उपक्रमात गोदावरी फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयंत नागुलकर व डॉ. कृतिका काळे यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी केला गेला. तसेच, डॉ. साक्षी भारंबे, डॉ. ऋतुजा शार्दुल, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. शुभम खंडारे, डॉ. नवी अग्रवाल आणि डॉ. प्रथमेश जोशी यांनी मुलांना व्यायाम व थेरपी सेवा दिली. उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष हर्षाली चौधरी व धनराज कासट यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक कार्य करत या उपक्रमाची अमूल्य कामगिरी केली. या कार्यक्रमांतर्गत सुमारे ७० विशेष गरज असलेल्या मुलांना मोफत थेरपी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात सहभागी फिजिओथेरपिस्टांनी पुढील काळात अशा उपक्रमांचे आयोजन नियमित करण्याचे आश्वासन दिले असून, उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रात प्रत्येक शनिवारी मोफत फिजिओथेरपी सेवा उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले.