अचानक पोलीस वाहन बंद पडल्याने पोलिसांना चारही हल्लेखोरांना न्यावे लागले पायी.
जळगाव/प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी वाढत चालली आहे.निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर हल्ला करणार्या वाळू माफियांपैकी चार जणांना काल दुपारी न्यायालयात नेत असताना अचानक पोलीस वाहन बंद पडले. त्यामुळे चारही हल्लेखोरांना जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा न्यायालय असे दीड कि.मी.पर्यंत पायी नेत न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांचे वाहन बंद पडल्याने हातात बेड्या असलेल्या हल्लेखोरांची एक प्रकारे शहरातून धिंड निघाल्याचे नागरिकांना पहायला मिळाले.
सुरुवातीला या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; पुरवणी जबाब घेतल्यानंतर अजून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे कारवाई करण्यासाठी गेलेले असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. त्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले होते. सुरुवातीला या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर पुरवणी जबाब घेतल्यानंतर अजून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात सुरुवातीला काही हल्लेखोरांना अटक करण्यात आली. यातील मुख्य संशयित विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे (वय-२८, रा. शंकरराव नगर) , मयूर दिनकर पाटील (वय-२५, साकेगाव, ता. भुसावळ), संदीप गणेश ठाकूर (वय-३०, रा. डीएनसी कॉलेजजवळ) व अक्षय नामदेव सपकाळे (वय-३०, रा. शंकरराव नगर) यांची काल शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर चौघांना जिल्हा न्यायालयात हजर करायचे होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहन बंद पडल्यामुळे चारही हल्लेखोरांची जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा न्यायालय पायी धिंड…
या अनुषंगाने त्यासाठी या चारही जणांना नशिराबाद पोलिस अधिकारी व कर्मचारी हे पोलिस वाहनातून न्यायालयात हजर करण्यासाठी निघाले. काल दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास हे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंद पडले. त्यामुळे चारही हल्लेखोरांना जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा न्यायालय असा सुमारे दीड किलोमीटरचा प्रवास हाती बेड्या असताना पायीच करावा लागला. दरम्यान, धिंड काढल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी असे प्रकार आवश्यक असल्याचा सूर उमटून नागरिकांनी या प्रकाराचे स्वागत केले.
तर, जिल्हा न्यायालयातील आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी. एम. एम. बडे यांनी चौघांना १८ फेब्रुवारी रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल ऍड. निखिल कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला.धिंड काढली जात होती तेव्हा बघ्यांनी गर्दी केली होती..