मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येत्या चार दिवसात तुफान पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे..महाराष्ट्रातील जनतेसाठी हवामान अंदाजाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. खास करून कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर हा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी तापाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी अतिशय पोषक असं वातावरण निर्माण झालं आहे. खास करून उद्या म्हणजेच 5 सप्टेंबरला राज्यात पावसाचा जोर हा तुलनेने अधिक असेल. त्यामुळे पुढील चार दिवस सावधगिरी बाळगा. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेला आहे..
उत्तर ओडिशा आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 7.6 कि.मी. उंचावर चक्राकार वारे अनुभवायला मिळत आहेत. हेच वारे पुढे ते झारखंडच्या दिशेने सरकत आहेत. हा कमी दाबाचा पट्टा बिकानेर, जयपूर, दामोह, संबलपूर आणि बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज ४ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर कोकण किनारपट्टीवरील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाटमाथा , पुणे घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात जोरदार सऱ्या कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अकोला अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळेल..
दुसरीकडे सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा जोर हा बऱ्याचशा प्रमाणात ओसरल्याचे दिसत आहे. या ठिकाणी आज मध्यम किंवा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरल्याने अडचणीत असलेल्या बळीराजाला काहीसा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.