भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- वरणगाव आयुध निर्माणीत आज आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत ‘मॉक ड्रील’ – म्हणजेच आपत्कालीन कृतीचा सराव – यशस्वीरित्या पार पडला. मुख्य प्रबंधक एम. झेड. सरवर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या ड्रीलमध्ये विविध आपत्कालीन यंत्रणांनी समन्वयाने सहभाग घेतला.
ड्रीलमध्ये फॅक्टरीच्या स्थापत्य अनुभागातील डिझेल व केरोसिन गुदामात आग लागून मोठा स्फोट होतो आणि त्यात पाच कर्मचारी अडकतात व भाजतात, अशा काल्पनिक घटनेचे दृश्य सादर करण्यात आले. या घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद कार्यवाही सुरू झाली.
आग विझवण्यासाठी व बचाव कार्यासाठी वरणगाव आयुध निर्माणी, वरणगाव नगरपालिका व भुसावळ येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तसेच, जखमी कर्मचाऱ्यांसाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाची तात्काळ मदत घेण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी त्वरित कारवाई करत परिसर सील केला.
या मॉक ड्रीलच्या निरीक्षणासाठी नरवीरसिंह रावळ – आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सचिन राऊत – मुख्याधिकारी, वरणगाव नगरपालिका, चेतन गायकवाड – सहाय्यक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, डॉ. रुपेश उगले – वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय वरणगाव, सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील – दर्यापूर ग्रामपंचायत व इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपमहाव्यवस्थापक नीलेश महाले यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. फॅक्टरी सेफ्टी ऑफिसर प्रशांत ठाकूर यांनी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून सरावाची योजना राबवली.अशा प्रकारचे मॉक ड्रील्स आपत्तीच्या काळातील सज्जता, प्रतिसादक्षमता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी ही महत्त्वाची पूर्वतयारी ठरते.