जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शाळा व महाविद्यालय परिसरातील विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलीसांकडून ठोस व जनहितकारी पावले उचलली जात आहेत. “She Team” अर्थात दामिनी पथक पुन्हा सक्रीय झाले असून, शहरातील विविध शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. टवाळखोरी व छेडछाड करणाऱ्यांवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई केली जात आहे.
गस्तीसाठी विशेष पथक रचना
प्रत्येक पोलिस ठाण्यातून दोन पुरुष व एक महिला पोलीस अधिकारी अशी एकूण १२ पुरुष व ६ महिला अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून, शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेस नियमित गस्त घालण्यात येत आहे.
९ जुलै २०२५ रोजीची ठोस कारवाई
दामिनी पथकाने मेहरुण तलाव परिसर, सेंट टेरेसा स्कूल, नूतन मराठा कॉलेज, एम.जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, का.ऊ. कोल्हे विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय आदी ठिकाणी गस्त घालत असताना काही युवक विनाकारण शाळेच्या गेटसमोर थांबून विद्यार्थिनींना पाहून अश्लील वर्तन करताना आढळले.त्यापैकी ९ तरुणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112/117 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर २५ तरुणांना समज देऊन सोडण्यात आले.
पालक आणि विद्यार्थिनींमध्ये समाधान
या कारवाईमुळे परिसरातील पालक वर्ग व विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन
ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे.