विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम व स्वदेशी संशोधनाची भावना जोपासण्याचा उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालय येथे केंद्र सरकार शिक्षण मंत्रालयाच्या सूचनेनुसार “विकसित भारत बिल्डथॉन – 2025” या महत्त्वाकांक्षी संशोधन स्पर्धेचे एल.सी.डी. प्रोजेक्टरमार्फत थेट प्रक्षेपण करण्यात आले. भैय्यासाहेब गंधे सभागृहात सकाळी 10 ते 12 या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात इयत्ता 6 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशीलता, सर्जनशीलता व स्वदेशी संशोधनाची भावना विकसित करणे हा होता. देशातील विविध दैनंदिन गरजा आणि समस्यांचे निराकरण स्थानिक संशोधनातून व्हावे, आत्मनिर्भर भारताची संकल्पना रुजावी यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अटल इनोव्हेशन मिशन व नीती आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. एजाज शेख यांनी विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण विचारांची जोपासना करण्याचे आणि या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत, ‘व्होकल फॉर लोकल’, स्वदेशी संशोधन, समृद्धी या संकल्पनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवनवीन कल्पना साकाराव्यात, असे आवाहन केले.
या वेळी उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, मार्गदर्शक शिक्षक श्री. पंकज खंडाळे, श्री. हिंमत काळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधूभगिनींनी उत्साहाने सहकार्य केले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.