धरणगाव/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील वीर जवान विनोद शिंदे – पाटील यांना रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान विनोद पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली.जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.या अंत्यसंस्कारप्रसंगी रोडवद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
भारतीय सैन्य दलात अहमदाबाद येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील (वय ३९) यांचा शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, शहीद जवानाची वार्ता रोटवदला धडकताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी रोटवद, ता. धरणगाव येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान विनोद पाटील अमर रहे’ यासह ‘ भारत माता की जय,’ वंदे मातरमच्या घोषणा देत होते. परिसर शोकमग्न झालेला होता.