नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने स्वयंशोध फाउंडेशन, नशिराबाद यांच्या वतीने ‘वीरांना वंदन – वीर पत्नी सन्मान सोहळा’ हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमात शौर्य आणि त्यागाची परंपरा जपणाऱ्या वीर पत्नींचा सन्मान करून उपस्थितांनी त्यांना सलाम केला.कार्यक्रमात मेघा शिंदे, अनिता पाटील, निर्मला महाले, भारती कोल्हे, रत्नमाला सोनवणे, शितल पाटील, फरीदा शेख, ज्योत्स्ना अहिरे आणि विजया हजारे या नऊ वीर पत्नींचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक जिल्हाध्यक्ष ईश्वर मोरे होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. समाजातील विविध घटकांनी एकत्र येत या उपक्रमाला प्रतिसाद दिला.कार्यक्रमादरम्यान बालकलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीत, नृत्य आणि वक्तृत्व सादरीकरणामुळे वातावरण भारावून गेले. त्यांच्या कलागुणांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली.या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी स्वयंशोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, सचिव धीरज सैतवाल यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन धीरज सैतवाल यांनी केले, प्रास्ताविक योगेश कोलते यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन चेतन सपकाळे यांनी केले.
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कुटुंबियांप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना जागृत करणारा हा उपक्रम ठरला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

