जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पाटबंधारे उपविभाग, जामनेर अंर्तगत असलेल्या वाघुर प्रकल्पात आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता 97 टक्के पाणीसाठा भरल्याची नोंद झाली आहे. वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला असून, नदी काठावरील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
प्रकल्पाचे द्वार परिचलन व पाण्याचा विसर्ग…
कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांच्या आदेशानुसार वाघुर प्रकल्पाच्या द्वार परिचलनासाठी आज सकाळी 8 वाजता विशेष कामकाज सुरू करण्यात आले असून, या द्वार परिचलनानंतर वाघुर नदीमध्ये नियमानुसार पाण्याचा विसर्ग सोडला गेला आहे.
पाण्याची आवक व विसर्ग वाढण्याची शक्यता….
सध्या वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. आवश्यकतेनुसार प्रकल्पात येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या प्रमाणानुसार विसर्गही वाढविण्यात येईल. त्यामुळे परिस्थितीचा काटेकोरपणे आढावा घेत नागरिकांसाठी विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीचे उपाय..
वाघुर नदीकाठावरील नागरिकांना शासकीय यंत्रणा तर्फे अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग झाल्याने नदीकाठावरील शेतीची पिके, पशुधन, गुरे-ढोरे, मवेशी, मोटार पंप यांसह अन्य चीज वस्तू सुरक्षित स्थळी हलवून घ्याव्यात. नदी काठावरील रहिवाशांनी कोणत्याही प्रकारच्या अनिष्ट घटनेपासून वाचण्यासाठी पुरेसा उपाय करावा, अशी सूचना पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे.
शासकीय यंत्रणांकडून घ्यावयाची दक्षता..
स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, तसेच इतर संबंधित शासकीय यंत्रणांनीही या संदर्भात दक्षतेचा उपाय करावा, पाणी विसर्गाच्या ठिकाणी तातडीने सहकार्य करावे, आणि परिस्थितीचे व्यवस्थापन करावे, असे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.