जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात एका महिला अधिकारी वाळूमाफियावर कारवाई करण्यासाठी गेल्या असतात त्यांच्यावर दमदाटी केल्याची घटना ताजी असतांना आज पुन्हा जळगाव शहरात वाळूमाफियांनी धूडघूस घालत एका महिला अधिकाऱ्याशी वाद घातल्याची घटना घडली आहे. शुक्रवार १ सप्टेंबर रोजी दुपारी केसी पार्क परिसरात वाळू वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करीत असलेल्या महसूल विभागाच्या महिला पथकाशी वाद घालून दमदाटी केली व वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात तिघांनी मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडळाधिकारी सारिका दुरगुडे, छाया कोळी, तलाठी मृणाली सोनवणे, आदिती जाधव, राजकन्या घायवट प्रज्ञाराणी वंजारे, अनिता झाल्टे यांच्या भरारी पथकाला शुक्रवारी पेट्रोलिंग करीत असताना दुपारी १२ वाजता कानळदा रोडवरील केसी पार्क येथे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आढळून आली. पथकाने त्यासमोर दुचाकी लावून ट्रॅक्टर चालकास रोखले. त्याची चौकशी करीत असताना चालकाचे तीन साथीदार तेथे आले. त्यांनी शाब्दिक वाद घालून दमदाटी करून पथकाच्या दुचाकी ट्रॅक्टर समोरून बाजूला केल्या. तसेच, तलाठी मृणाली सोनवणे यांच्या दुचाकीला धक्का देत बाजूला करीत ट्रॅक्टर चालकाला पळून जाण्यास मदत केली. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे तलाठी सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

