जळगाव | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील एका व्यावसायिकाला अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तब्बल ४ लाख ६४ हजार ४३९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना गुरुवारी, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, निलेश हेमराज सराफ (वय ४९, रा. अजय कॉलनी, रिंगरोड, जळगाव) हे खाजगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून “कस्टमर सर्विस सपोर्ट” या नावाचे एक APK फाईल पाठवले. सदर फाईल डाउनलोड केल्यानंतर UPI अॅपच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ६४ हजार ४३९ रुपये काढून घेतले गेल्याचे उघड झाले.
या घटनेची तक्रार देण्यासाठी निलेश सराफ यांनी ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकधारक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सायबर पोलिसांकडून संबंधित क्रमांकाचा शोध घेण्याचे व फसवणुकीचे सुतोवाच लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदर प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, अज्ञात क्रमांकावरून येणारे संदेश, लिंक्स अथवा फाईल्स डाऊनलोड करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. नागरिकांनी यापुढे अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.