यावल । प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केला असून चोपडा व जळगाव येथील तीन सराईत आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला धुळे येथील कुख्यात गुन्हेगार साहील सत्तार शहा व त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. अटकेतील आरोपींकडून चोरीस गेलेली तब्बल १३ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) (लूट जबरी चोरी), ३५१(३) (गुन्हेगारी धमकी) व १२६(२) (अटकाव करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करून भुसावळ, यावल, चोपडा व जळगाव शहरात चार विशेष पथके रवाना करण्यात आली.
तपासादरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हा हा चोपडा व जळगाव शहरातील पाच आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचून खालील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.यात जुबेर खान हमीद खान (वय ३३), रा. चोपडा, शोएब शेख इस्माईल शेख (वय २५), रा. हुडको, जळगाव, ईस्माईल खान शेर खान (वय २५), रा. हुडको, जळगाव.सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत हा गुन्हा जुबेर खान, शोएब शेख, ईस्माईल खान, साहील सत्तार शहा (रा. धुळे) व अनस शहा (रा. जळगाव) यांनी संगनमताने केल्याचे मान्य केले. अटक आरोपींकडून त्यांच्या वाट्याला आलेले १३,००,००० रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, फरार आरोपी साहील सत्तार शहा हा धुळे येथील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत व अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी, वाहन चोरी, मंदिर चोरी तसेच अमली पदार्थ कायद्यान्वये एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. या कुख्यात गुन्हेगाराच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्याला जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने केली आहे

