Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादुर्दैवी घटना! त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत मार्गावर दरड कोसळली, बीडच्या भाविकाचा मृत्यू..!

दुर्दैवी घटना! त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत मार्गावर दरड कोसळली, बीडच्या भाविकाचा मृत्यू..!

नाशिक/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असताना दरड कोसळल्याने एकाचा मृत्यू ओढवला आहे. त्र्यंबकेश्वर शहराच्या चहूबाजुंनी अनेक डोंगर आहेत.परिसरातील ब्रह्मगिरी पर्वतावरून दरड कोसळल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.अनेक जण जखमी सुद्धा झाले आहेत. अशातच काल दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दरड कोसळून एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्या सुट्ट्यांचे दिवस असल्याने त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग आणि ब्रम्हगिरी, गंगाद्वार दर्शनासाठी भाविकांची रोजच गर्दी आहे. गर्दीचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे अनेक भाविक जोतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन गंगा गोदावरीचे दर्शन घेत असतात. मात्र गेल्या काही वर्षात ब्रम्हगीरी पर्वतावरून दरड कोसळल्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच काल बीड जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी ब्रम्हगिरी पर्वतावर जाऊन दर्शन घेत खाली उतरत होते. याच वेळी पर्वतावरून दरड कोसळली. यात भाविकांच्या अंगावर दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली . दुपारच्या सुमारास ही घटना घडली .

याबाबत त्रंबकेश्वर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास अश्रू आरडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हरळी लिमगाव येथील रहिवासी आहेत. आरडे हे कुटुंबियांसह त्र्यंबकेश्वर देवदर्शनासाठी आले होते. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास दर्शनासाठी ब्रह्मगिरीवर गेले होते. ब्रह्मगिरीहुन खाली उतरत असताना ब्रह्मा गुफेजवळ ही घटना घडली. आरडे यांच्या अंगावर तीन ते चार दगड पडल्याने हातपाय आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ब्रह्मगिरीवरुन डोलीवाल्यांच्या सहकार्याने मयत व्यक्तीस गंगाद्वार येथे आणले. त्यानंतर गंगाद्वारवरून त्र्यंबकराजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डॉ. प्रशांत पाटील यांनी जखमी रुग्णास तपासून मृत घोषित केले.पुढील तपास सुरू आहे. भाविकांनी या मार्गावरून जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या