Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeनशिराबादनशिराबाद ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर बसविण्यास तिव्र विरोध : आंदोलनाचा इशारा

नशिराबाद ग्रामस्थांचा स्मार्ट मीटर बसविण्यास तिव्र विरोध : आंदोलनाचा इशारा

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद गावात महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गावातील माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थ प्रतिनिधींनी उप कार्यकारी अधिकारी अजय बसू, उप अभियंता पवन वाघुळदे यांना निवेदन देऊन हा निर्णय तातडीने थांबविण्याची मागणी केली. या प्रसंगी माजी सरपंच पंकज महाजन, निलेश रोटे, राजेश कोष्टी यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

निवेदनातील प्रमुख मुद्दे

१) शासनाचा स्पष्ट आदेश नाही – स्मार्ट मीटर संदर्भात शासनाकडून कोणताही स्पष्ट आदेश किंवा निर्णय प्रसारित न झाल्याने, जबरदस्तीने बसविण्यात येणारी ही यंत्रणा कायदेशीरदृष्ट्या शंकास्पद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

२) अतिरिक्त आर्थिक भार – स्मार्ट मीटर बसविल्यानंतर विज बिलात अनपेक्षित वाढ झाल्याचे अनेक उदाहरणे समोर आली असून, यामुळे नागरीकांवर अन्यायकारक आर्थिक बोजा पडणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

३) शेतकरी व सामान्य लोकांचे नुकसान – नशिराबाद हे शेतकरी प्रधान व सामान्य नागरिकांचे गाव असून, येथे बहुतांश लोक हातावर पोट भरणारे आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अन्यायकारक ठरेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत केलेले आश्वासनही अधोरेखित केले की, “सामान्य नागरिकांच्या घरी स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जाणार नाहीत.”

आंदोलनाचा इशारा

निवेदनात ग्रामस्थांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे की, जर पुढील १५ दिवसांत योग्य ती कारवाई झाली नाही, तर दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात प्रतीकात्मक स्वरूपात स्मार्ट मीटरची होळी करण्यात येईल. या सर्व घडामोडींसाठी विज वितरण महामंडळ जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

निवेदनावर सही करणारे प्रतिनिधी

माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांच्यासह निलेश सुरेश रोटे, राजेश हरी कोष्टी, चंद्रकांत देवीदास पाटील, विनोद मधुकर भोळे, देवेंद्र हेमराज पाटील, केवल धनाशाम पाटील, प्रसाद निवृत्ती राने, चंदन गणेश नारखेडे, संतोष खेमचंद नारखेडे, किशोर ज्ञानदेव नारखेडे, चंद्रशेखर एकनाथ पाटील व कल्पेश रमेश पाटील आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या गंभीर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी विज वितरण महामंडळाकडे व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या