Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव: तरसोद ते कालिंकामाता रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य ; रस्त्यात खड्डे की खड्ड्यात...

जळगाव: तरसोद ते कालिंकामाता रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य ; रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?

रस्त्याचे उद्घाटन झाले थाटात….पण लोक मात्र वाट पाहतात…! खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले ; काम चालू होण्याआधी तात्पुरती डागडुजी करण्याची नागरिकांतून मागणी.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :– जळगाव-तरसोद हा मुख्य मार्ग असून शेकडो गावकऱ्यांचा दैनंदिन प्रवास या रस्त्यावरून होत असतो. मात्र सध्या या रस्त्याने खड्ड्यांचे साम्राज्य गाजवले असून नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरसोदपासून ते कालिंका अयोध्यानगरपर्यंत रस्त्याचा मोठा भाग खड्ड्यांनी पोखरला असून “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

अपघातांचे प्रमाण वाढले.
खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना अक्षरशः सर्कस करावी लागत आहे. खड्डे चुकविताना अचानक समोर येणाऱ्या वाहनांना धडकण्याचे प्रकार वाढले असून किरकोळ अपघातांसोबतच गंभीर अपघातांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. “दररोज सकाळी मुलांना शाळेत सोडताना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागते. रस्ता म्हणजे धोका बनला आहे,” असे एका महिला प्रवाशिनीने संतापाने सांगितले.

उद्घाटन झाले पण काम कधी?
नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या रस्त्याचे सिमेंटिकरण करण्याचे उद्घाटन झाले होते. तसेच कालिंका माता ते तरसोददरम्यान रस्ता मंजूर झाल्याची माहिती दिली होती. मात्र नागरिकांचे म्हणणे आहे की, “उद्घाटन झाले, आश्वासने दिली, पण कामाच्या बाबतीत मात्र संपूर्ण शांतता आहे. आजपर्यंत एकही कामगार किंवा यंत्रसामग्री रस्त्यावर उतरलेली दिसली नाही.”

काम चालू होण्याआधी तात्पुरती डागडुजी करण्याची नागरिकांतून मागणी..तर प्रशासनाकडून तातडीची अपेक्षा.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी, विद्यार्थी, कामगार वर्ग यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. वाहतूकदार आणि खासगी वाहनचालक यांचा प्रवास धोकादायक ठरत आहे. काम चालू होण्याआधी तात्पुरती डागडुजी करण्याची नागरिकांतून मागणी जोर धरीत आहे. “संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावा. मंजूर प्रकल्पाला त्वरित गती द्यावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रशासनाचा नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद.
संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तरसोद-जळगाव रस्त्याचे सिमेंटिकरण काम मंजूर झाले असून लवकरच त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दरम्यान तात्पुरत्या उपाययोजनांद्वारे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले जाईल, जेणेकरून नागरिकांना प्रवासात अडचणी येणार नाहीत.”

जळगाव-तरसोद रस्त्याची पार्श्वभूमी.
जळगाव-तरसोद हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी एक असून बाजारपेठेकडे जाणारा प्रमुख दुवा आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असून अनेकदा निधी मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांचा संयम संपत चालला आहे. अपघातांना आमंत्रण देणाऱ्या या खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या