Wednesday, August 5, 2026
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणअसोदा बायपासनंतर जळगाव–शेळगाव मार्गावरील खारी दाब पूल एका बाजूने खचला; मोठ्या अपघाताची...

असोदा बायपासनंतर जळगाव–शेळगाव मार्गावरील खारी दाब पूल एका बाजूने खचला; मोठ्या अपघाताची भीती

पाणी थेट पुलावरून वाहिल्याने नुकसान; नाली तातडीने मोकळी करून पुलाची दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- 
असोदा–जळगाव शेतरस्त्यावरील भारत पेट्रोलियम पंपाजवळील हॉटेल साई बाबा परिसरातील खारी डाब पुलाचा एक भाग मुसळधार पावसामुळे एका बाजूने खचल्याने मोठा अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी असोदा येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित ठिकाणी पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक क्षमतेचा पाईप न टाकता नाली दाबून टाकण्यात आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. हे पाणी थेट मुख्य रस्त्यावरील पुलावरून वाहत खारी डाबमध्ये जात असल्यामुळे पुलाच्या एका बाजूचा भाग खचला असून रस्त्यालगत मोठी दरड निर्माण झाली आहे.

सदर दरड रस्त्याच्या अगदी कडेला निर्माण झाल्याने कोणतेही वाहन घसरून त्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्यास दरड आणखी वाढून पुलालाही धोका निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून या परिसरात मुख्य रस्ता खचण्याची समस्या सातत्याने उद्भवत आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या पावसामुळे पुन्हा दुसऱ्या ठिकाणी रस्ता खचू लागल्याने नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या पार्श्वभूमीवर हॉटेल साई बाबा परिसरापर्यंतची बंद झालेली नाली तातडीने मोकळी करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, जेणेकरून शेतरस्त्यावर पाणी साचणार नाही आणि मुख्य रस्त्याचे पुढील नुकसानही टळेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच खचलेल्या पुलाच्या भागाची तातडीने दुरुस्ती करून तेथे संरक्षण कठडे उभारावेत, आवश्यक इशारा फलक लावावेत आणि अपघात टाळण्यासाठी त्वरित सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सदर निवेदनावर असोदा येथील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या