नशिराबाद : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासह नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने विविध गणेश मंडळांमध्ये जनजागृती करण्यात आली. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंडळांना भेटी देत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्सव काळातील खबरदारीबाबत सूचना केल्या.गणेश मंडप व परिसरात माहितीपर फलक लावून नागरिकांना सायबर फसवणूक, आपत्कालीन मदत, गर्दीतील चोरी तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक, संदेश किंवा फोनला प्रतिसाद देऊ नये. तसेच बँक खाते, एटीएम, ओटीपी अथवा अन्य गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले.आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी तातडीने डायल ११२ या पोलीस हेल्पलाइनचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले. गणेश दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीत महिलांनी दागिने व मौल्यवान वस्तूंबाबत विशेष दक्षता बाळगावी, तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दीमध्ये संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या.उत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहनांचे पार्किंग नियमानुसार करण्यासह रस्त्यावर अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी मंडळांना केले. दरम्यान, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मंडप परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था, अग्निसुरक्षा साधने आणि आवश्यक खबरदारी ठेवून पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नशिराबाद पोलिसांच्या वतीने करण्यात आले.