१४ व १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सुनसगाव, ता. भुसावळ | प्रतिनिधी जितेंद्र काटे :- जळगाव जिल्हा क्रीडा परिषद व भुसावळ तालुका शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२६-२७ अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत १४ व १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. या दुहेरी यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.१४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव आणि दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय, सुनसगाव यांच्यात सामना झाला. या सामन्यात सुनसगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविला.
त्यानंतर १७ वर्षांखालील गटातील अंतिम सामना ओझरखेडा हायस्कूल आणि सुनसगावच्या दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयाच्या संघात रंगला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सुनसगावच्या मुलींनी दमदार खेळ करत विजय मिळविला आणि जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.विद्यालयाच्या या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आर. डी. पाटील व मुख्याध्यापक के. डी. तायडे यांनी विजयी खेळाडू तसेच त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यू. जी. राठोड यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.