नगरपरिषदेच्या बैठकीत पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन
नशिराबाद, दि. २२ : शहरातील प्लास्टिकचा वाढता वापर कमी करून नशिराबादला स्वच्छ व पर्यावरणपूरक शहर बनविण्याच्या उद्देशाने नशिराबाद नगरपरिषदेच्या पुढाकाराने व्यावसायिक व दुकानदारांची विशेष बैठक घेण्यात आली. महावीर भवन, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या बैठकीत विविध व्यवसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्यास सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन व मुख्याधिकारी रविंद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील किराणा, पान, चहा तसेच अन्य आस्थापनांच्या प्रतिनिधींशी प्लास्टिकमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी नगरसेवक चेतन बऱ्हाटे, मनोज पाटील, नगरसेविका लीनाताई महाजन, भारताबाई धनगर व सुवर्णा महाजन यांच्यासह नगरपरिषदेचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://www.facebook.com/share/r/1XnokytCzb/
बैठकीदरम्यान प्लास्टिकमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा शहराच्या स्वच्छतेवर होणारा परिणाम, नाले व जलनिस्सारण व्यवस्थेत निर्माण होणारे अडथळे तसेच पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. दुकानदार व व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवहारात प्लास्टिकचा वापर कमी करून त्याऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.अभियानाच्या अंमलबजावणीदरम्यान व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, पर्यायी साधनांचा वापर आणि त्यासंदर्भातील विविध प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.बैठकीस उपमुख्याधिकारी तनवीर आझाद पटेल, पाणीपुरवठा अधिकारी अतुल चौधरी, विद्युत अभियंता पराग रुले, संगणक अभियंता सचिन पल्हाडे, लेखाधिकारी मनोज गोरे, कर व प्रशासकीय अधिकारी गीतांजली राऊत, नगररचना सहाय्यक गायत्री पाटील, प्रशासकीय अधिकारी राहुल धनवडे, स्थापत्य अभियंता शुभम जाधव, शहर समन्वयक समीर पिंजारी व आरोग्य निरीक्षक वीरेंद्र घारू यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.कैलास व्यवहारे, विकास धनगर, अतुल जैन, किशोर पाटील, सोपान पाचपांडे, शेख अब्दुलउद्दीन शेख निजामुद्दीन, अभिजीत वाणी, राकेश माळी, वकार खाटीक, प्रदीप कुलकर्णी, शेख अबिद (मास्टर किराणा), आकिब हारून खाटीक, राजू खंडू चौधरी, निलेश पिंगळे व भिकाजी भोई यांच्यासह अनेक दुकानदार व व्यावसायिकांनी बैठकीस उपस्थित राहून अभियानाला सहकार्य दर्शविले. पत्रकार हरीश पाटील व इम्रान शेख यांचीही उपस्थिती होती.
प्लास्टिकचा वापर कमी झाल्यास शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण घटण्यासोबतच सार्वजनिक स्वच्छता, जलनिस्सारण व्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे. त्यामुळे ‘प्लास्टिकमुक्त नशिराबाद’ हे उद्दिष्ट केवळ नगरपरिषदेपुरते मर्यादित न ठेवता नागरिक, दुकानदार आणि व्यावसायिकांच्या सहभागातून ते प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.