भुसावळ | प्रतिनिधी जितेंद्र काटे :- भुसावळ तालुका पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी २२ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करणे, त्यांच्या हक्कांसाठी प्रशासनाकडे प्रभावीपणे भूमिका मांडणे तसेच प्रशासन आणि पोलीस पाटील यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने कार्यकारिणीची निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विनोद सपकाळे (गोजोरे), कार्याध्यक्षपदी रमाकांत बाळू पिंगळे, उपाध्यक्षपदी मनीषा बावस्कर (कुऱ्हा पानाचे), सचिवपदी विजय धांडे, तर संघटकपदी भूषण पाटील यांची निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर तालुक्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस पाटलांचे मानधन, प्रशासकीय अडचणी, सेवा-सुविधा तसेच अन्य प्रलंबित प्रश्न शासनस्तरावर मांडून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असतात. गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासनाशी संबंधित कामकाजात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याने पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.नवनियुक्त अध्यक्ष विनोद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुका पोलीस पाटील संघटना अधिक संघटित व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास पोलीस पाटील बांधवांनी व्यक्त केला. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.