मालदाभाडी येथील शेतातून १३ किलो ४३० ग्रॅम गांजा जप्त; ३ लाख ३५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
जामनेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे स्वतःच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करणाऱ्या शेतमालकाविरुद्ध जामनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजाची १३ किलो ४३० ग्रॅम वजनाची झाडे जप्त केली असून, त्यांची अंदाजे किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जामनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने दुपारी २.१५ वाजता मालदाभाडी, ता. जामनेर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी अनिल दगडू पाटील (रा. मालदाभाडी, ता. जामनेर) यांच्या मालकीच्या शेतात प्रतिबंधित गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची झाडे मुळांसह जप्त केली. या झाडांचे एकूण वजन १३ किलो ४३० ग्रॅम असून, त्यांची अंदाजे किंमत ३ लाख ३५ हजार ७५० रुपये आहे.आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच भविष्यात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आरोपी अनिल दगडू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, पाचोरा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बोन्हाडे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोळंके, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांच्यासह सहायक फौजदार साहिल तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश चौधरी, राजू तायडे, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, विशाल लाड, ज्ञानेश्वर देशमुख, राजेश लहासे व चालक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

