Friday, November 6, 2026
police dakshta logo
Homeजळगावदिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दिवाळीची झळाळी; उडानच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक भेटवस्तू

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दिवाळीची झळाळी; उडानच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या आकर्षक भेटवस्तू

जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जिवने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उत्पादनांचे अनावरण

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दिव्यांग विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांना स्वावलंबनाची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, या उद्देशाने रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या वतीने दिवाळीनिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला कलात्मकतेची जोड देत आकर्षक पणत्या, दिवे, गिफ्ट बॉक्स, चॉकलेट आणि ड्रायफ्रूट बॉक्स तयार केले आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंना शहरातील उद्योजक आणि व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यासाठी अनेकांनी विविध वस्तूंची आगाऊ नोंदणी केली होती.विद्यार्थ्यांनी मेहनतीने तयार केलेल्या या उत्पादनांचे अनावरण जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापालिका आयुक्त आदित्य जिवने, जैन उद्योग समूहाचे अतुलभाऊ जैन आणि सुप्रीम कंपनीचे व्यवस्थापक सुरेश मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी हर्षाली चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची माहिती दिली. उत्पादननिर्मितीची प्रक्रिया, विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच या माध्यमातून रोजगारनिर्मितीसाठी करण्यात येणारे प्रयत्न याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या या आकर्षक वस्तू दिवाळीची शोभा वाढविण्यासोबतच त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरत आहेत. समाजातील विविध घटकांनी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडू शकते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती ढाके यांनी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र पाटील, कल्पना रोटे आणि जयश्री पटेल यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या