आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते उपक्रम; शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत तातडीने कार्यवाहीच्या सूचना
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :-: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, बहिणाबाई ब्रिगेड आणि खानदेश बायो ऑरगॅनिक इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नशिराबाद व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कृषी औषधी किटचे वाटप करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. यावेळी आमदार भोळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश (राजू मामा) भोळे होते. यावेळी नशिराबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रदीप (बंडू) भोळे, प्रदेश सदस्य तथा नगरसेवक प्रदीप रोटे, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष हर्षा बोरोले, जिल्हाध्यक्ष सुनीता नारखेडे, स्वाती भोळे, युवक महासंघाचे महानगराध्यक्ष महेश चौधरी, मधुकर भंगाळे, दीक्षा ॲग्रोचे संचालक प्रशांत बाणाईत, ग्रीन टेक लॅबोरेटरीचे संचालक राजेश नारखेडे, व्यंकटेश ॲग्रोचे सवी बेंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान शेतकरी जितेंद्र बराटे, निलेश बोंडे, केतन बोंडे, रामकृष्ण माळी आणि अशोक पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. यामध्ये शेतरस्त्यांचा प्रश्न, वीज वितरण कंपनीशी संबंधित अडचणी, नीलगायींच्या उपद्रवामुळे होणारे शेतीचे नुकसान तसेच वन विभागाशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता. आमदार भोळे यांनी या समस्या गांभीर्याने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला आणि प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार भोळे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांकडे वळावे, पशुधन वाढवावे आणि उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत, असे आवाहन केले. युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आधुनिक शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व संस्था आणि कंपन्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.यावेळी ॲड. प्रकाश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बहिणाबाई ब्रिगेड महिला मंडळाच्या भुसावळ शहराध्यक्ष मनीषा पाटील, वैशाली पाटील, मेघा कुरकुरे, वैशाली चौधरी, सदस्य चेतना खडसे, पुनम कोलते तसेच भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि नशिराबाद येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीचे नियोजन मुकुंदा भाऊ रोटे यांनी केले, तर आभार सुनीता नारखेडे यांनी मानले. यावेळी युवक महासंघाचे निखिल रडे, अविनाश पाटील, सागर चौधरी, अजय पाटील, श्याम भारंबे, बेलव्हाद ग्रामपंचायतीचे सरपंच जितू दादा खाचणे, वैभव खाचणे, ज्ञानदेव कुरकुरे, चंदन पाटील, विशाल पाटील यांच्यासह नशिराबाद व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत त्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.

