Thursday, November 5, 2026
police dakshta logo
Homeक्राईमजुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणीच्या नावाने ‘हनीट्रॅप’; दोघांना अटक

जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणीच्या नावाने ‘हनीट्रॅप’; दोघांना अटक

इन्स्टाग्रामवरून जाळे रचून तरुणाला बोलावले; लोखंडी रॉडने हल्ला करून दोन राऊंड गोळीबार

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जुन्या वादातून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून तरुणाला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर लोखंडी रॉडने डोक्यावर व पायावर हल्ला करून दोन राऊंड गोळीबार केल्याची घटना वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर घडली. या प्रकरणाचा उलगडा करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता फिर्यादी सरफराज सय्यद साकीर सय्यद (वय २४, रा. काझीपुरा, मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांना एका तरुणीच्या नावाने असलेल्या इन्स्टाग्राम खात्यावरून संदेश व कॉल करून फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते. तेथे पोहोचताच अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने डोक्यावर व पायावर प्राणघातक हल्ला केला. तसेच गावठी कट्ट्यातून दोन राऊंड गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. या प्रकरणी भूषण ऊर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०, रा. फेकरी, ता. भुसावळ) आणि सिद्धार्थ रामदास तिडवे (वय २७, रा. फेकरी, ता. भुसावळ) यांना गुन्ह्यातील सहभागाच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली गावठी कट्टा, मोटारसायकल व मोबाइल याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

जुन्या अपमानातून कट

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२५ रोजी बोदवड–मुक्ताईनगर महामार्गावर झालेल्या वाहन अपघातादरम्यान सरफराज सय्यद व त्याच्या मित्रांचा संशयितांशी वाद झाला होता. या वादात सरफराज व त्याच्या साथीदारांनी संशयितांची गाडी फोडून त्यांना मारहाण केली होती. या घटनेचा अपमान मनात ठेवून बदला घेण्याचे आरोपींनी ठरवले होते.त्यासाठी भूषण सावळे याने आपल्या मैत्रिणीच्या नावाने इन्स्टाग्राम खाते तयार केले. फिर्यादीने १७ ऑक्टोबर २०२६ पासून त्या खात्याला रिक्वेस्ट पाठवल्यानंतर संवाद सुरू झाला. १ नोव्हेंबर रोजी सकाळपासून आरोपी फिर्यादीशी चॅटिंग करत होते. सायंकाळी त्याला भेटण्यासाठी बोलावून घेतल्यानंतर आरोपींनी मोटारसायकलवरून घटनास्थळी येत हल्ला केला. हल्ल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भूषणने मोबाइलमधील इन्स्टाग्राम खाते तातडीने डिअॅक्टिव्हेट केले.तपासादरम्यान आरोपींनी वापरलेल्या गावठी कट्ट्याबाबत विचारपूस केली असता, तो त्यांचा पूर्वीचा साथीदार मृत सागर कहार याने अपघातात मृत्यूपूर्वी भूषणला दिल्याचे निष्पन्न झाले. सागर कहार याच्याविरुद्धही भुसावळ शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे व नंदकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, दीपक जनादळे, जितेंद्र वळते, संतोष पवार तसेच सायबर पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या