विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे व वस्तूंचे स्टॉल्स मांडत गिरवले व्यावहारिक ज्ञानाचे धडे!
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालयात दीपावलीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून दीपोत्सव व आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे तसेच हस्तनिर्मित वस्तूंचे स्टॉल्स मांडून व्यावसायिकता आणि व्यवस्थापनाचे प्राथमिक धडे गिरवले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास चौधरी, उपाध्यक्ष विनायक वाणी, नगराध्यक्ष तथा कार्याध्यक्ष योगेश पाटील, उपकार्याध्यक्षा प्रमिलाताई महाजन, संस्थेचे सचिव मधुकर चौबे, संचालक जनार्दन माळी, राजेंद्र पाटील, सुनीता पाटील, ॲड. प्रदीप देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता बनसोडे, उपमुख्याध्यापक अनिल चौधरी, पर्यवेक्षक एस. एन. पाचपांडे, जे. वाय. महाजन तसेच प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रवीण महाजन उपस्थित होते. दीपोत्सवाच्या निमित्ताने शाळा परिसर आकर्षक पणत्या, रंगीबेरंगी आकाशकंदील आणि सुंदर रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून विविध रंगांच्या रांगोळ्यांमध्ये पणत्या प्रज्वलित केल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय आणि चैतन्यमय झाला होता. दीपोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एल. पाचपांडे यांनी केले.
आनंद मेळाव्यात खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सना प्रतिसाद
आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध रुचकर खाद्यपदार्थांचे आणि हस्तनिर्मित वस्तूंचे स्टॉल्स मांडले होते. यामध्ये भेल, पाणीपुरी, शेवपुरी, वडापाव, विविध प्रकारच्या मिठाई तसेच दीपावली फराळाचा समावेश होता. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पदार्थांची विक्री करताना व्यवस्थित हिशेब ठेवला.संस्थेचे पदाधिकारी, पालक आणि नशिराबाद परिसरातील नागरिकांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी बालगोपालांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमाचे नियोजन पूजा पाटील, नंदिनी सूर्यवंशी, निकिता शृंगाळे, मंगला पिंगळे आणि वर्षा नारखेडे यांनी केले. त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

