Thursday, November 5, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याबेमुदत उपोषणाला एका दिवसात यश; भाईदास केदार यांना न्याय

बेमुदत उपोषणाला एका दिवसात यश; भाईदास केदार यांना न्याय

खडका सर्कलमध्ये प्रशासकीय बदलीचे लेखी आश्वासन; तात्पुरती प्रतिनियुक्ती देत उपोषणाची सांगता

भुसावळ | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- भुसावळ येथील खडका येथे कामाच्या ठिकाणी हीन दर्जाची वागणूक दिल्याच्या निषेधार्थ न्यायाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केलेल्या बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष व श्रेणी-१ कर्मचारी भाईदास केदार यांना एका दिवसात न्याय मिळाला. प्रशासकीय बदलीचे लेखी आश्वासन आणि तात्पुरती प्रतिनियुक्ती देण्यात आल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी त्यांच्या उपोषणाची सांगता करण्यात आली.आमळनेर (पारेषण) येथे मुख्य तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास केदार यांनी खडका सर्कल कार्यालयांतर्गत जळगाव विभागात २ नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. गैरवर्तणूक करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कंपनीच्या नियमानुसार कारवाई करण्यात यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती.या प्रकरणाची माहिती मिळताच बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे शिष्टमंडळ सरचिटणीस अॅड. राजन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दाखल झाले. शिष्टमंडळात तांत्रिक सल्लागार सुलेमान तडवी, उपसरचिटणीस कैलास पाटील, कार्याध्यक्ष (वितरण, नाशिक झोन) सुनील कुमावत, संघटक राजाभाऊ केदार आणि जळगाव झोनचे दीपक पवार यांचा समावेश होता.

शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता एम. आर. पाटील आणि खडका सर्कलचे अधीक्षक अभियंता देशमुख यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. चौकशी अधिकारी आणि त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित कर्मचाऱ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. तसेच, मार्च-एप्रिल महिन्यातील बदली धोरणानुसार प्रशासकीय बदली करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याची अन्य ठिकाणी तात्पुरती प्रतिनियुक्ती करण्यात आली.अधीक्षक अभियंता देशमुख आणि कार्यकारी अभियंता पाटील यांनी भाईदास केदार यांना सरबत पाजून उपोषणाची सांगता केली. लेखी आश्वासन आणि प्रतिनियुक्तीच्या आदेशामुळे हा प्रश्न शांततेत मार्गी लागल्याचे समाधान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या वेळी खडका सर्कलचे व्यवस्थापक सोनार, पराग सरोदे (यूडीसी) आणि उपव्यवस्थापक गांगुर्डे यांनी सहकार्य केले. एका दिवसात उपोषणाची दखल घेऊन प्रश्न मार्गी लागल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या