गिरणा मोठ्या प्रकल्पाच्या रब्बी हंगाम २०२६-२७ च्या कालवा सल्लागार समितीची बैठक; ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन होणार
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एल-निनोच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाई टाळण्यासाठी तसेच मोठ्या, मध्यम व लघुप्रकल्पांमधील पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने आज, शुक्रवार (दि. ६ नोव्हेंबर) रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गिरणा भवन, आकाशवाणी केंद्रासमोर, जळगाव येथील गिरणा खोरे विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील गिरणा मोठा प्रकल्प, ता. नांदगाव, जि. नाशिक या प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची रब्बी हंगाम २०२६-२७ ची बैठक जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आली आहे.जलसंपदा मंत्री तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश दत्तात्रय महाजन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. बैठकीत एल-निनोच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन, तसेच मोठ्या, मध्यम व लघुप्रकल्पांमधील पाणीवापराचे नियोजन यावर सविस्तर चर्चा होणार आहे.शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील समिती कक्षात प्रत्यक्ष तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करणे, सिंचनासाठी पाण्याचे योग्य वाटप करणे आणि संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयांकडे शेतकरी आणि पाणीवापरदारांचे लक्ष लागले आहे.

