Saturday, November 7, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजारांचे सानुग्रह अनुदान!

नशिराबाद नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजारांचे सानुग्रह अनुदान!

दिवाळीनिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोनस व मिठाईचे वाटप; प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या हस्ते कार्यक्रम

नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दिवाळी सणानिमित्त नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बोनस व मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता नगरपरिषद कार्यालयात हा कार्यक्रम प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.यावेळी नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन व मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस व मिठाईचे वाटप करण्यात आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

दरम्यान, ‘नगरपरिषद आपल्या दारी’ या संकल्पनेतून पुन्हा एकदा विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन यांनी दिली. या मोहिमेंतर्गत प्रभारी नगराध्यक्ष, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी जनजागृती करणार आहेत.शहरात कुठे पाणीगळती होत आहे, याचा शोध घेऊन त्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी सतत वाहून जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवरही कारवाई केली जाईल. याशिवाय नागरिक बाहेरगावी गेलेले असताना घरातील नळ सुरू राहून पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

“पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणी बचतीच्या मोहिमेला सहकार्य करावे,” असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या