जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव-चोपडा मार्गावरील तापी नदीवरील विदगाव पुलावर काल (दि. 30 सप्टेंबर) रात्री उशीरा अवैध वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कुटुंबातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथून जळगावकडे येत असलेल्या डंपरने पुलावर कारला समोरून जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार हवेत उडून पुलाचा कठडा तोडत थेट नदीपात्रातील वाळूवर कोसळली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की, काही अंतरावर राहणाऱ्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात विठ्ठल नगर येथील रहिवासी मीनाक्षी निलेश चौधरी (व्यवसाय : शिक्षिका) व त्यांचा मुलगा पार्थ यांचा मृत्यू झाला. तर निलेश प्रभाकर चौधरी (व्यवसाय : शिक्षक, धानोरा) आणि त्यांचा दुसरा मुलगा ध्रुव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौधरी कुटुंबावर काळाचा घाला कोसळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच यावल तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले असून या घटनेने पुन्हा एकदा बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

