रावेर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. २७ ऑक्टोबर रोजी रावेर तालुक्यातील दिप ॲग्रोटेक शोरूम येथे ट्रॅक्टर दुरुस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकऱ्याला शोरूम व्यवस्थापकाकडून धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा आपल्या कुटुंबासह चिनावल येथे राहून शेती व्यवसाय करतात. शेती कामासाठी यावर्षीच्या जुलै महिन्यात त्यांनी रावेर येथील दिप ॲग्रोटेक शोरूम मधून महिंद्रा ओजा कंपनीचे २१३० मॉडेल ट्रॅक्टर विकत घेतले होते. काही दिवसांपूर्वी सदर ट्रॅक्टरच्या गेअर बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फिर्यादीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी शोरूमला फोन करून माहिती दिली होती. त्यावेळी शोरूमकडून “मेकॅनिक पाठवतो” असे आश्वासन देण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ट्रॅक्टर रिपेअर साठी कोणीही आले नाही.
यानंतर दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादीचा मुलगा केतन हा ट्रॅक्टर घेऊन शोरूमवर गेला. दुपारी सुमारास १२ वाजेच्या दरम्यान त्याने वडिलांना फोन करून सांगितले की, “शोरूममधील कर्मचारी ट्रॅक्टर दुरुस्ती करण्यास नकार देत आहेत.” हे ऐकताच फिर्यादी स्वतः चिनावल येथून रावेर येथे आले. तेथे त्यांनी शोरूममधील मॅनेजर अमीर मोहम्मद (पूर्ण नाव माहीत नाही) यांना “आमचे ट्रॅक्टर दुरुस्ती का करत नाही?” असा प्रश्न विचारला असता, मॅनेजर अमीर मोहम्मद यांनी संतापून फिर्यादीस उद्देशून “तुमचे ट्रॅक्टर आम्ही दुरुस्ती करणार नाही, तुम्ही येथून निघून जा” असे बोलले. त्यानंतर त्यांनी हातात असलेला लोखंडी अँगल दाखवत “तुझे ट्रॅक्टर घेऊन जा, नाहीतर अँगल तुझ्या डोक्यात मारेन” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने आपल्या तक्रारीत केला आहे.
या घटनेमुळे फिर्यादी घाबरला असून, संबंधित प्रकरणी त्याने पोलिस ठाण्यात अदखलपात्र अहवाल दाखल केला आहे. घटनेची नोंद घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून, शोरूम व्यवस्थापकाकडून स्पष्टीकरण मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांशी संबंधित सेवा देणाऱ्या शोरूममधून अशा घटना घडणे चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. वेळेवर सेवा व दुरुस्ती न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने संबंधित विभागांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

