आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता ; राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही आठवड्यांत जाहीर होणार
मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यात बराच काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठीची तयारी वेगात सुरू केली असून, नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम डिसेंबरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी पार पाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्यातील विविध नगरपालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या उमेदवारीसाठी पक्षांतर्गत लॉबिंग सुरू केल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदार यादी तयार करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रथम नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
निवडणूक प्रक्रियेचा आराखडा अंतिम टप्प्यात…
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्राथमिक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून डिसेंबर अखेरपर्यंत नगरपालिका निवडणुका पार पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे अधिवेशनादरम्यान सरकारला नवीन योजना किंवा घोषणा करता येणार नाहीत, फक्त विधेयकांपुरतीच कामकाजाची मर्यादा राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश...
सुप्रीम कोर्टाने जानेवारी 2026 अखेरपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार प्रथम टप्प्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वातावरण तापणार!
डिसेंबरपर्यंत नगरपालिका व पंचायत निवडणुका पार पडल्यास वर्षाच्या अखेरीस आणि नव्या वर्षाच्या प्रारंभी राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान चढणार हे निश्चित आहे. विविध पक्षांनी स्थानिक पातळीवर आपली संघटनात्मक चाचणी म्हणून या निवडणुकांकडे पाहणे सुरू केले असून, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींमुळे तालुका ते गावपातळीवरील राजकारणात उत्सुकता वाढली आहे.

