मुंबई | प्रतिनिधी । पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तोंडओळखीचा बिगुल वाजणार असून, पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात तयारी पूर्ण केली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.या निवडणुका घोषणेनंतर अवघ्या २१ दिवसांत पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा होणार असून, शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुका घेण्यात येतील.
तीन टप्प्यांत पार पडणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अशा सर्व निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे निवडणूक आयोगाचे नियोजन आहे.
नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका, तर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आचारसंहिता लागू होणार सोमवारी किंवा मंगळवारी…
निवडणुकीची घोषणा सोमवारी किंवा मंगळवारी होण्याची शक्यता असून, त्यानंतर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे उमेदवार व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार आहे.
महापालिका निवडणुका जानेवारीत…
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ ते २० जानेवारी २०२६ या दरम्यान घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी १० दिवस आधी पार पडण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बदलले नियोजन…
राज्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे निवडणुकीचे वेळापत्रक ठरवताना प्रशासनाने विशेष काळजी घेतली आहे.अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्यास योग्य परिस्थिती नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आयोगाने प्राथमिक टप्प्यात नगरपालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

