जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयटीसी संगीत रिसर्च अकादमी, कोलकाता यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन जळगाव येथील भैय्यासाहेब गंधे सभागृहात करण्यात आले आहे. या महोत्सवात अकादमीचे दोन स्कॉलर आणि दोन प्रथितयश कलावंत सहभाग घेत असून, रसिकांना शास्त्रीय संगीताचा अप्रतिम आस्वाद मिळत आहे.पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंदनेने झाली. दीपप्रज्वलनाचे मानकरी आयटीसी संगीत अकादमीचे गुरु पं. ओंकार दादरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर आणि प्रा. शरदचंद्र छापेकर होते. अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांनी मान्यवरांचा सत्कार केला, तर प्रास्ताविक दीपक चांदोरकर यांनी केले.
यानंतर अकादमीच्या वतीने गुरु पं. ओंकार दादरकर यांनी रसिकांशी संवाद साधला. पहिल्या सत्रात अकादमीचे युवा कलाकार कौस्तव रॉय यांनी सरोद वादन सादर केले. त्यांना भोपाळ येथील तबलावादक रामेंद्रसिंह सोलंकी यांनी साथ दिली. कौस्तव यांनी राग श्री मध्ये जोड आणि झाला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर धमार व अध्दा तालातील रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. दुसऱ्या सत्रात पं. ओंकार दादरकर यांनी विलंबित झुमरा तालात राग मारुबिहाग मधील बडा ख्याल “जागे मेरे भाग” सादर केला. त्यानंतर दृत एकतालातील “पारी मोरी नाव” ही बंदिश सादर केली. यानंतर विदुषी गिरीजादेवी यांनी स्वरबद्ध केलेला मिश्र किरवाणी रागातील दादरा “तुम बिन गाईन” सादर करत रसिकांना शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी पं. दादरकर यांनी आपल्या आत्या, जेष्ठ गायिका विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचीच अजरामर भैरवी “अगं वैकुंठीचे राया” तसेच भजन “अमृताहुनी गोड नाम तुझे देवा” सादर करून मैफिलीची सांगता केली. पं. दादरकर यांना तबल्यावर युवा तबलावादक तेजोवृष जोशी आणि संवादिनीवर अनंत जोशी यांनी अप्रतिम साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अनघा नाईक-गोडबोले यांनी केले.उद्या महोत्सवाचा दुसरा दिवस असून, प्रथम सत्रात नुपूर चांदोरकर-खटावकर आणि आर्या शेंदुर्णीकर या जळगावच्या युवा कलाकारांकडून गुरुवंदना आणि कथक नृत्य सादर केले जाईल. द्वितीय सत्रात अकादमीचा स्कॉलर अनुभव खामरू यांचे शास्त्रीय गायन तर तृतीय आणि समारोप सत्रात पं. रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन सादर होईल.
हा अविस्मरणीय संगीतसोहळा चुकवू नये, असे आवाहन आयटीसी संगीत रिसर्च अकादमी आणि चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे जळगावकर रसिकांना करण्यात आले आहे.

