Thursday, March 26, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याब्रेकिंग न्यूज: राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद ; नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची...

ब्रेकिंग न्यूज: राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद ; नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता

मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोग आज ४ नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असून, या परिषदेत पहिल्या टप्प्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे स्वतः उपस्थित राहणार आहेत.राज्यात एकूण २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आयोगाकडून अधिकृत घोषणा होताच राज्यभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू केली होती. आयोगाने मतदार यादी पुनरावलोकन, आरक्षण निर्धारण, मतदान केंद्रांची पुनर्रचना आदी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याचे कळते.राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पहिला टप्पा – नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका.
दुसरा टप्पा – जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका.
तिसरा टप्पा – मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका.

गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. यामुळे स्थानिक पातळीवरील विकासकामे, लोकप्रतिनिधींचे प्रशासकीय कार्य आणि लोकसहभाग ठप्प झाला होता. आता राज्य निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली असून, आजच्या पत्रकार परिषदेतच पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी पेटणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या