जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महायुतीतील वाढता तणाव आणि जागावाटपातील अडथळे लक्षात घेता, अजित पवार गटानें स्वबळाचा पर्याय उघडा ठेवत महत्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा नेतृत्वानें सर्व शहरप्रमुखांना आपल्या उमेदवारांकडून तात्काळ अर्ज दाखल करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अर्ज दाखल झाल्यानंतर जर माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी जागावाटपाबाबत तोडगा निघाला, तर महायुती म्हणून लढण्याची शक्यता खुली राहणार आहे. मात्र, तसा निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणुकीत उतरण्याची तयारी पूर्ण असल्याचे गटाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भाजप आणि शिंदेसेनेकडून अजित पवार गटाला वारंवार दुर्लक्षित केल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. पारोळा, एरंडोल, नशिराबाद आणि धरणगाव या महत्त्वाच्या केंद्रांमध्ये महायुतीचा निर्णय जाहीर झाला असला तरी, या समीकरणात फक्त भाजप आणि शिंदेसेनेचा समावेश असून अजित पवार गटाला चर्चेच्या केंद्रस्थानी स्थान नसल्याचे दिसून येत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील नगरपालिकांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे सूत्रांकडून समजते.या असंतोषाला अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनीही दुजोरा दिला आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून, युती करताना भाजप व शिंदेसेने आपल्या गटाला दुय्यम स्थान देत असल्याची भावना तीव्र होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अल्पसंख्याक बहुल भागात मर्यादित जागांचा प्रस्ताव
याबाबत बोलताना संजय पवार म्हणाले की, युतीच्या चर्चेदरम्यान भाजप-शिंदेसेनेतर्फे अजित पवार गटाला केवळ अल्पसंख्याक बहुल प्रभागातच मर्यादित जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. नशिराबादमध्येही सहा प्रभाग देण्याचा प्रस्ताव समोर आला असून, धरणगाव, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगावमध्येही अशीच भूमिका घेतली जाऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.
युतीचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने, इच्छुक सर्व उमेदवारांना अर्ज भरायला सांगण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

