Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबाद निवडणूक विशेष: नशिराबादमध्ये बस सेवेचा प्रश्‍न नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांसाठी गंभीर मुद्दा...

नशिराबाद निवडणूक विशेष: नशिराबादमध्ये बस सेवेचा प्रश्‍न नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांसाठी गंभीर मुद्दा ठरणार..

बस गावात येण्यासाठी नागरिकांची मागणी ; विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत सर्वांचा आवाज बुलंद.
अपक्ष उमेदवारांना आज मिळणार अधिकृत निशाणी.
मतदारांमध्ये समीकरणे बदलतेय?
मातब्बर नेते बॅकफूटवर.. तर नवखे आणि अपक्ष उमेदवारांची आघाडी..!

नशिराबाद | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्याच्या नकाशावरील सर्वात मोठे गाव म्हणून नशिराबादची ओळख असली, तरीही गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्‍न अद्याप मार्गी लागलेला नाही. नवीन हायवे आणि उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर गावात बस येणे बंद झाले असून, या मागणीसाठी झालेल्या अनेक आंदोलनांनंतरही लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे. पूर्वी गावात सर्व बसेस थेट प्रवेश करत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत आणि जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रवास सुलभ आणि सुरक्षित होता. मात्र आता बस थांबा गावाबाहेर हायवेलगत करण्यात आला असून, त्या ठिकाणी बसण्याची सुविधा नाही. अतिक्रमण, अनियमित पार्किंग आणि असुरक्षित वातावरणामुळे बसेस न थांबता पुढे जात आहेत. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत.रात्रीच्या वेळी महिलांना त्या भागातून जाण्याची भिती वाटत असून, विद्यार्थिनींना अंधारात बिनसुरक्षा उभे रहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. हायवेवरील लाईट सकाळी अंधार असतानाच बंद होण्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.या गंभीर प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष न दिल्याने लोकप्रतिनिधींविषयी असंतोष वाढत असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीत मतदार असंतोषाचा फटका उमेदवारांना बसू शकतो, असे संकेत मिळत आहेत. विद्यार्थ्यांनी, जेष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी आपल्या भावना पोलीस दक्षता लाईव्हच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केल्या.

अपक्ष उमेदवारांना आज मिळणार अधिकृत निशाणी.
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत आज, २६ नोव्हेंबर रोजी सर्व अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हे व अनुक्रमांक वितरित करण्यात येणार आहेत. आतापर्यंत अपक्ष उमेदवार केवळ वैयक्तिक प्रचारावर अवलंबून होते. त्यांच्याकडे निशाणी नसल्याने जनसंपर्क मर्यादित स्वरूपात होत होता.अधिकृत पक्षांनी त्यांच्या निशाणीच्या बळावर प्रचाराला वेग दिला असून ती जनमानसात पोहोचली आहे. मात्र आता अपक्ष उमेदवारांना केवळ चार दिवसांमध्ये आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवावी लागणार आहे. या अल्प मुदतीत अपक्ष किती प्रभावी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदारांमध्ये समीकरणे बदलतेय?
मातब्बर नेते बॅकफूटवर.. तर नवखे आणि अपक्ष उमेदवारांची आघाडी..!
नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, नवखे आणि अपक्ष उमेदवार फ्रंटफुटवर खेळताना दिसत आहेत. हे उमेदवार वैयक्तिक भेटीगाठी घेऊन मतदारांपर्यंत थेट पोहोचत आहेत. दैनंदिन अडचणी, मूलभूत गरजा आणि विकास यावर थेट चर्चा करून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न ते करत आहेत.त्याउलट अधिकृत पॅनलमधील उमेदवार रॅली आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क साधत असले तरी वैयक्तिक स्तरावरील संपर्कात ते मागे पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा फायदा अपक्ष उमेदवार पुरेपूर घेत असून, वैयक्तिक प्रचार प्रभावी ठरत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या