नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- ५० हजारांहून अधिक लोकसंख्या आणि राष्ट्रीय महामार्गावर स्थित असलेल्या नशिराबाद शहरातील पोलीस व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत. नशिराबाद पोलिस ठाण्यात ५ अधिकारी व ४५ पोलीस कर्मचारी कार्यरत असतानाही रात्रीच्या वेळी फक्त १ ते २च कर्मचारी उपस्थित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.याहूनही गंभीर बाब म्हणजे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले नशिराबाद पोलिस मुख्यालय पूर्णपणे रिकामे असून एकही अधिकारी किंवा कर्मचारी वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी शहर आणि परिसर अक्षरशः रामभरोसे असल्याची नागरिकांची भावना आहे.
गेल्या काही महिन्यांत नशिराबादसह परिसरात घरफोड्या, मालवाहू गाड्या चोरी, गुरांची चोरी, मारहाणीच्या घटना, वाहतुकीतील नियमभंग आणि अवैध धंद्यांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रात्री गस्त कमी असल्याचा फायदा गुन्हेगार घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.नशिराबाद हे मोठे, संवेदनशील आणि विस्तारित शहर असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक खेडी समाविष्ट आहेत. अशा परिस्थितीत सतत उपलब्ध पोलीस मनुष्यबळ अत्यावश्यक असताना रात्री मनुष्यबळ अत्यल्प राहणे चिंताजनक आहे. राष्ट्रीय महामार्गावरील शहर असल्याने अपघात, वाद, तातडीच्या घटना कोणत्याही वेळी घडू शकतात. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्वरित प्रतिसाद देणे कठीण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांनी रात्रपाळीत पोलीस संख्या वाढवणे, मुख्यालयात अधिकारी-कर्मचारी वास्तव्यास ठेवणे आणि गस्त पद्धती मजबूत करण्याची तातडीची मागणी केली आहे. वाढत्या गुन्हेगारी व पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे नशिराबादमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

