Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या केळी उत्पादकांना दिलासा मिळावा ; ओलावृष्टि-विमा संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवण्याची संसदेत...

जळगावच्या केळी उत्पादकांना दिलासा मिळावा ; ओलावृष्टि-विमा संरक्षण ३१ मेपर्यंत वाढवण्याची संसदेत मागणी – खा.स्मिता वाघ

जळगाव । प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील लाखो केळी उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न प्रभावीपणे मांडत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. देशातील सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावची ओळख असली तरी गेल्या काही वर्षांत अनियमित पाऊस, सलग उच्च आर्द्रता, ओलावृष्टि आणि अचानक बदलणारे वातावरणीय चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.खासदार वाघ यांनी या नुकसानीचे गांभीर्य अधोरेखित करताना विद्यमान फळस्वर-हवामान आधारित विमा योजनेतील त्रुटी स्पष्टपणे मांडल्या. सध्या ओलावृष्टि जोखीम कालावधी १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत निश्चित आहे. मात्र प्रत्यक्ष हवामान आकडेवारी, कृषी विभागाचे अहवाल आणि स्थानिक हवामान केंद्राच्या नोंदींनुसार मे महिन्याच्या अखेरीपर्यंत सलग पावसामुळे उच्च आर्द्रता व ओलावृष्टिचा धोका मोठ्या प्रमाणावर कायम असतो. अनेक वेळा सलग ३-४ दिवस पडणारा पाऊस आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता केळी पिकांच्या वाढीवर, गुणवत्तेवर आणि उत्पादनावर थेट विपरीत परिणाम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

“शेतकऱ्यांचे नुकसान हे केवळ नोंदीतील तारखांनी मोजता येत नाही. प्रत्यक्ष हवामान बदलाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विमा जोखीम कालावधी ३१ मेपर्यंत वाढविणे हे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य, न्याय्य आणि तातडीचे आहे. तसेच सलग अनेक दिवस टिकणाऱ्या प्रतिकूल हवामान स्थितींनाही विमा कव्हरमध्ये समाविष्ट केले पाहिजे,” अशी ठाम मागणी खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र सरकारकडे केली.या प्रस्तावामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापक संरक्षण होईल आणि त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्यमापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील केळी उद्योगाला मिळणाऱ्या या संभाव्य दिलाशामुळे शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या