Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगाव शहर रिंग रोड विकासाला गती देण्याची खा. स्मिता वाघ यांची केंद्राकडे...

जळगाव शहर रिंग रोड विकासाला गती देण्याची खा. स्मिता वाघ यांची केंद्राकडे मागणी.

खासदार स्मिता वाघ यांचे नितीन गडकरींना पत्र ; वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होऊन औद्योगिक क्षेत्राला मिळणार चालना.

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहराबाह्य रिंग रोड उभारणीला गती देण्याची मागणी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भातील प्रस्तावासह सविस्तर पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्द केले. खासदार वाघ यांनी नमूद केले आहे की, शहरातील मुख्य मार्गांवरील दिवसेंदिवस वाढणारी रहदारी, अपघातांचा वाढता धोका आणि वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिंग रोड हा अत्यावश्यक प्रकल्प ठरत आहे. रिंग रोड उभारल्यास शहरात येणाऱ्या बाह्य वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल आणि मध्यवर्ती मार्गांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क, कृषी व्यापार तसेच आर्थिक प्रवाहाला थेट चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने तयार करून रिंग रोडला केंद्राच्या प्रमुख पायाभूत सुविधा योजनांमध्ये समाविष्ट करण्याची विनंतीही खासदार वाघ यांनी केली आहे. तांत्रिक सर्वेक्षण आणि वाहतूक तज्ज्ञांच्या अहवालांच्या आधारे हा प्रकल्प प्राधान्याने हाती घ्यावा, अशी मागणी त्यांनी मांडली.

रिंग रोडसाठी सुचवण्यात आलेले प्रमुख जोडमार्ग
NH-53 (सूरत–नागपूर), NH-753F (बूरहानपूर–औरंगाबाद), NH-753J (जळगाव–चाळीसगाव) तसेच प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) व आंतर-जिल्हा मार्गांचा समावेश असेल.

जळगावच्या विस्ताराला मोठी संधी

जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद ते पाळधी या सुमारे १८ किलोमीटरच्या बायपास रस्त्यामुळे परिसरातील गावांचे नशीब उजळले आहे. बायपासच्या उभारणीनंतर इथल्या जमिनींच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. उपलब्ध मोकळी जमीन आणि भविष्यातील विकासाची शक्यता या कारणांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर व्यवहार वाढले. आता रिंगरोड सुमारे ४० किलोमीटर असेल, त्यात धरणगाव, जळगाव आणि एरंडोल तालुक्यातील ११ गावे जोडण्यात येणार आहेत. पाळधी, दोनगाव, फूपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, मन्यारखेडा, कुसुंबा मोहाडी आणि पुन्हा पाळधी अशी गावांची साखळी असणार आहे.

“जळगावचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम आहे. रिंग रोड उभारल्यास वाहतूक व्यवस्थापन, उद्योगविकास, नागरी सुरक्षा आणि आर्थिक गतिवाढ यामध्ये मोठे परिवर्तन घडेल. शहराला याचा दीर्घकालीन फायदा होणार आहे,” असे खासदार वाघ यांनी पत्रात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या