नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद व परिसरात जनावरांच्या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, दि.२२ डिसेंबर रोजी मध्यरात्री चार जनावरे चोरी गेल्याची घटना घडली असून, या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, सलग चोऱ्या होऊनही अद्याप एकाही प्रकरणात चोरांचा ठोस माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
सविस्तर वृत्त असे की, दि. २२ रोजी मध्यरात्री नशिराबाद पेठ व लगतच्या भागात एकाच रात्री दोन जनावरे आणि न्यू इंग्लिश स्कूल जवळील जागेत मुक्कामाला असलेल्या ऊसतोड कामगारांचे दोन बैल असे एकूण चार जनावरे चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नशिराबाद पेठ भागातून प्रल्हाद बोदरु धनगर यांची एक गाय अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तसेच पेठ परिसरालगत असलेल्या वीटभट्टी भागातूनही आणखी एका गायीची चोरी झाली आहे.याच रात्री न्यू इंग्लिश स्कूलजवळ वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगारांची बैलजोडीही चोरीस गेली. याबाबत विष्णू मांगू जाधव (रा.चाळीसगाव) यांनी माहिती दिली असून, या गंभीर घटनांनंतरही अद्याप कोणत्याही प्रकरणात अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते. बैल इंडिका गाडीतून चोरी गेल्याची माहिती ऊस तोड कामगारांकडून मिळत आहे.दरम्यान, यापूर्वीही मागील आठवड्यात दिनांक 13 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास नशिराबाद पेठ परिसरातील शेतकरी किरण रमेश पाटील यांची म्हैस चोरीचा गेल्याचा प्रकार घडला होता. तर उमाळा रोडवरील शेताच्या अन्य एक गोठ्यातून हितेश आनंदा चौधरी यांची म्हैस जागेवरून सोडून नेत असताना तेथील कामगाराला जाग आल्याने म्हैस जागेवर सोडून चोरांनी पळ काढला , त्या प्रकरणाचाही तपास अद्याप प्रलंबित असून चोरांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पोलिस तपासाच्या कार्यक्षमतेबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सतत वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून रात्री घराबाहेर पडायलाही भीतीचे वातावरण आहे. परिसरात नियमित रात्रीची गस्त, सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी, तसेच तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांकडून होत आहे.
याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशन येथे संपर्क केला असता नशिराबाद पोलिस स्टेशनचे API आसाराम मनोरे यांनी याबाबत तपास सुरू असून परिसरातील CCTV तपासणी सह संबंधित प्रकरणाची सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती दिली. परंतु याबाबत अजून पर्यंत गुन्हा दाखल नसल्याचे कळते.नशिराबाद परिसरातील वाढत्या जनावरांच्या चोरीकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

