जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराला पुढील पाच वर्षांत विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा ठाम संकल्प जाहीर करत, त्यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या ‘आयटी पार्क’ प्रकल्पाला आता गती मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाईप उत्पादन, डाळमिल प्रक्रिया आणि चटई उद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगाव औद्योगिक वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. बदलत्या औद्योगिक गरजा आणि रोजगारनिर्मितीच्या संधी लक्षात घेता, विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सुमारे २०० एकर जागा राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही अनुकूलता दर्शवली आहे.
सध्याच्या औद्योगिक वसाहतीत पारंपरिक उद्योगांचे वर्चस्व असून, नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित उद्योगांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याची गरज होती. त्याच अनुषंगाने आयटी पार्क, स्टार्टअप्ससाठी विशेष झोन तसेच सेवा क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
आधुनिक सुविधांनी सुसज्ज आयटी पार्क
प्रस्तावित आयटी पार्कमध्ये हाय-स्पीड इंटरनेट, २४ तास वीज व पाणीपुरवठा, प्रशस्त रस्ते, पार्किंग व्यवस्था तसेच कौशल्य विकास केंद्रांचा समावेश असणार आहे. यामुळे स्थानिक युवकांना पुणे, मुंबई, बंगळुरू यांसारख्या शहरांकडे स्थलांतर न करता जळगावमध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यातील औद्योगिक विकास आयटी व सेवा क्षेत्रालाही प्राधान्य देत बहुआयामी करण्याचा प्रयत्न असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचित केले आहे.
आदर्श औद्योगिक केंद्राकडे वाटचाल
या निर्णयाचे स्थानिक उद्योजक, व्यापारी संघटना व नागरिकांनी स्वागत केले आहे. आयटी उद्योगांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, पूरक व्यवसायांना चालना मिळेल तसेच शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लवकरच प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर होणार असून, विकासकामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. पारंपरिक उद्योगांची भक्कम पायाभरणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे जळगाव औद्योगिक वसाहत राज्यातील आदर्श औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
बाह्यवळण महामार्गालगत नव्या विकासाच्या संधी
जळगाव शहराबाहेरून जाणारा बाह्यवळण महामार्ग खुला झाल्यानंतर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर उत्तर दिशेला ‘नवे जळगाव’ विकसित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. वाहतूक कोंडीपासून मुक्तता, जलद दळणवळण आणि मोकळ्या जागांची उपलब्धता यामुळे या परिसराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. बाह्यवळण महामार्गालगत कृषी प्रक्रिया उद्योग, सोलर प्रकल्प तसेच आयटी पार्क उभारणीच्या मागण्या पूर्ण झाल्यास, जळगाव परिसरातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार आहे

