Sunday, March 15, 2026
police dakshta logo
Homeताज्या बातम्याकुऱ्हे पानाचे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’; विविध योजनांचा लाभ मिळाल्याने...

कुऱ्हे पानाचे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’; विविध योजनांचा लाभ मिळाल्याने लाभार्थी समाधानी

भुसावळ | जितेंद्र काटे | पोलीस दक्षता लाईव्ह :- शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान अंतर्गत टप्पा क्रमांक एकमधील दुसरे शिबिर भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे रेणुका माता मंदिर परिसरात पार पडले. विविध शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कुऱ्हे पानाचे येथील सरपंच दुर्गाताई शिंदे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांनी केले.यावेळी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व कायद्यांमधील नव्या बदलांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ. श्रीमंत हारकर यांनी महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी जनावरांमध्ये आढळणाऱ्या ‘माउथ अँड फूट’ रोगापासून संरक्षणासाठी सर्व जनावरांचे लसीकरण करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रीती लुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार पूजा अवघडे यांनी मानले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक तसेच विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरातील लाभांचे वाटप पुढीलप्रमाणे:
विशेष सहाय्य योजना – ७६ लाभार्थी, लक्ष्मी मुक्ती योजना – २७, ई-शिधापत्रिका – ४७, शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले – २३९, उत्पन्न, जात व अधिवास प्रमाणपत्रे – १०४७, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे – २५. तसेच ३६ व ३६अ नोंदी असलेले ७/१२ – ११, अपाक शेरा कमी – ७, जिवंत ७/१२ – ८२, ‘माझा ७/१२ अचूक ७/१२’ विशेष मोहिमेत – ९५, प्रलंबित फेरफार निर्गती – १३८, वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर – १८, तुकडा शेरा कमी – ८३ आणि खाते एकत्रीकरण – १७ प्रकरणांची पूर्तता करण्यात आली.

या शिबिराला एकूण ६७३ लाभार्थ्यांनी उपस्थिती लावली. विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष ठिकाणी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या